भोर : जिल्हा परिषद शाळेतील आठ मुलींच्या विनयभंग प्रकरणात पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. प्रवीण दिनकर बोबडे असे जामीन मिळालेल्या आरोपी शिक्षकाचे नाव असून पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
भोर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षकाने आठ मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार मुलींच्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे केली होती. त्यानंतर मुख्याध्यापकांनी 22 मार्च 2024 रोजी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.
आरोपी शिक्षकाच्या वतीने अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीवर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो निर्दोष असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपीने शाळेतील अल्पोपहार योजनेतील गैरव्यवहार उघड केल्यामुळे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा दावा केला.
सरकारी पक्ष व आरोपी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. मयूर चौधरी, अॅड. स्वप्नील दाभाडे, अॅड. मीनाक्षी चव्हाण, आणि अॅड. अजीज इनामदार यांनी मदत केली.