भोर प्रतिनिधी-कुंदन झांजले
भोर तालुक्यातील निवडणूक लागलेल्या १३ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवार (दि ६) जाहीर झाले १३ ग्रामपंचायतीपैकी सर्वात जास्त ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारल्याचा दावा केला असून उद्या (दि७ नोव्हेंबर) आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस असल्याने आमदार थोपटेंना ग्रामपंचायत विजयाची कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया रविवार (दि.५) शांततेत पार पडली होती. त्याची मतमोजणी सोमवार(दि.६) भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) केंद्रात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.१३ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी ८३.५४ टक्के मतदान झाले होते ,१० हजार २९८ पैकी ८ हजार ५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती व निवडून आलेले सरपंच दुर्वा सुभाष कंक( दापकेर ), नामदेव दगडू पवार (शिरवली), बबन मालुसरे (हिरडोशी), वैशाली योगेश कुडले (करंजे),अशोक जगन्नाथ तुपे(वरोडी खु), शीतल संदीप भिलारे (वरोडी) , सुनीता तुकाराम म्हस्के(पळसोशी), सोनाली दिपक कुमकर(महुडे खु), सुनीता दिघे (जयतपाड), मनीषा सुदाम ओंबळे( कांबरे बु), सुवर्णा निगडे (वडतुंबी), विशाल खोपडे (नाटंबी), कल्याणी मोरे (माळेगाव) हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत तर निवडणूक झालेल्या व निवडून आलेल्या काही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट /शरद पवार गट) ,शिवसेना(उबाठा)यांनी आपल्या ग्रामपंचायती असल्याचा दावा केला आहे. तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीवर महिला कारभारी असणार आहेत तर ४ ग्रामपंचायतीवर पुरुषांचे वर्चस्व असणार आहे.