पावसाचा जोर कायम, कमी दाबाचा पट्टा
भोर तालुक्यासह सर्वत्रच पावसाचा जोर कायम असुन भोर व राजगड (वेल्हा) तालुक्यात अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवामान खात्याच्या वेधशाळेकडून पुढील २४ तासात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले
मागील आठ दिवसांपासून भोर व राजगड (वेल्हा)तालुक्यातीत घाट माथ्यावर, डोंगरभागासह ग्रामीण ,शहरी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी,सतर्कता बाळगवी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने व भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी नागरिकांना केले आहे.तसेच शाळांना सुट्टी असली तरी फक्त विद्यार्थ्यांसाठी ही सुट्टी असुन शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक, कर्मचारी यांना सुट्टी नसुन त्यांनी शाळेच्या वेळेत कामकाज पुर्ण करण्यासाठी उपस्थित रहाणे असे सांगितले आहे.तसेच पावसाचा जोर कायम असल्याने निरा देवघर व भाटघर धरण पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नदी काठच्या गावांनीही सतर्कता बाळगावी असेही आवाहन केले आहे.भाटघर धरणात सद्यस्थितीला ६७ टक्के, निरादेवघर ६० टक्के, वीर धरण ८५ टक्के ,तर गुंजवणी ७१ टक्के भरले असल्याचे संबंधित प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे .या महिन्यातील ९ तारखेला ही अशीच सुट्टी जाहीर केली होती.या महिन्यात दोन सुट्ट्या मिळाल्याने शाळेतील मुले भलतीच खुश झाली आहेत.