खंडाळा: खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील निकम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका युवकास खंडाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल भिवाजी सणस (२२, रा. वाशी, नवी मुंबई) हा निकम कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून फोन करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याने कुटुंबियांना ४० लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली होती. या धमक्यांमुळे घाबरलेल्या रोहिणी निकम यांनी शनिवारी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. कौशल्याने केलेल्या तपासात पोलिसांनी आरोपी राहुल सणसला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील शेळके, पोलीस अंमलदार शरद तांबे, अमित चव्हाण व नितीन महांगरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहाय्यक फौजदार आर. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.