शिरुर: प्रतिनिधी तेजस फडके
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या सर्वांचे मी खुप आभार मानतो. तसेच शाळेतील मुलांनी चांगला अभ्यास करुन स्वतःचे भवितव्य घडवले पाहिजे, असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या कार्यालयात आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वकृत्व तसेच रांगोळी स्पर्धा यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे गुरवार (दि. २९) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी तुतारी हलगीच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आमदार अशोक पवार यांचे स्वागत केले. तसेच प्रवेशदारावर औक्षण करत त्यांना पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राणी बनकर यांनी आमदार पवार यांची प्रतिमा सुंदर रांगोळीत साकारली होती. याचे आमदार पवार यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे आमदार पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महिला भगिनींनी लाल दिवा असलेल्या ॲम्बेसिडर गाडीच्या आकाराचा केक बनवून आणला होता. अशोक पवार यांच्या हस्ते मंत्री पदाच्या गाडीचा केक कापून त्यांना भावी मंत्रीपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी सैनिकांचा सन्मान
यावेळी निबंध, वक्तृत्व, तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिरुर तालुक्यातील १२० माजी सैनिकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पत्रकारांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी, तर सुत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले. आभार गिता आढाव यांनी मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, जिल्हा उपाध्यक्ष शामकांत वर्पे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गोरे, युवकचे तालुका उपाध्यक्ष केशव शिंदे, नगरसेवक रविंद्र ढोबळे, सरपंच गोविंद कुरुंदळे, शिरुर ग्रुप सोसायटीचे संचालक शरद पवार, चेअरमन अप्पा वर्पे, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, साधना पतसंस्थेच्या अध्यक्षा साधना शितोळे, राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, शिरुर शहर अध्यक्षा डॉ. स्मिता कवाद, डॉ. सेल अध्यक्षा डॉ. स्मिता बोरा, अश्विनी जाधव तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.