भोर: हळूहळू विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नूकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय साकारत बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला असे बोलले जात आहे. भोर मधुन विजयी मताधिक्य देत विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे या निवडणुकीत विजयाचे किंगमेकर ठरल्याने पुन्हा आमदार थोपटेंचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र आहे.
काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे भोर वेल्हा मुळशी या विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांचे गावभेट दौरे, जनसंवाद यात्रा , विविध विकास कामे कार्यक्रम पुस्तिका, सोशल मीडियावरील व्हिडिओ, रिल्स सुरू झाले आहेत. तर इच्छुकांनी विविध उपक्रमातून साहित्य वाटपाने तालुक्यातील नागरिकांचा चांगला फायदा होताना दिसत आहे.
इच्छुक उमेदवारांची आमदारासाठी रस्सीखेच
महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे असुन ,शिवसेना उ बा ठा गटाकडुन मुळशीतुन शंकर मांडेकर यांनी रस्त्यालगत सर्वत्र भावी आमदार असे फ्लेक्स लावून व रायरेश्वरावचे दर्शन घेऊन शिवसंवाद,जनसंवाद यात्रेतुन आपण इच्छुक आहे असे सांगितले आहे. महायुतीतुन भाजपाकडून माजी नगरसेवक किरण दगडेपाटील,तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना शिंदे गटाकडून भोरमधुन कुलदीप कोंडे, शिवसेना शिंदे गटाकडून मुळशीतुन बाळासाहेब चांदोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जि.प सदस्य विक्रम खुटवड अशी इच्छुक उमेदवारांची आमदारासाठी रस्सीखेच होणार आहे.
तर जनसेवक भाजपचे तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर यांनीही दहा दिवसांचे उपोषण करत आपणही कोठेही इच्छुकात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.त्यामुळे सलग तीन वेळा निवडून आलेले मंत्री पदाचे दावेदार विद्यमान आमदार संग्राम थोपटेंच्या साम्राज्यात जास्त उमेदवाराचा फायदा थोपटेंना बसणार की यावेळी जनता चित्र पालटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
यावेळी जागा वाटपात कोणता पक्ष कोणती उमेदवारी मागतोय व हि उमेदवारी कोणाला मिळतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाली नाही तर जरी मुळशीतुन शंकर मांडेकर हे जरी इच्छुक असले तरी मात्र लोकसभेला विजयाचे शिल्पकार ठरलेले कॉंग्रेसचे संग्राम थोपटे हेच उमेदवार असणार आहेत असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. महायुतीत मात्र या मतदारसंघात जास्त इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून या मतदारसंघात मोठा गोंधळ होणार असल्याचे चित्र आहे. भाजपच्या किरण दगडे यांनी लोकांच्या तीर्थ यात्रा, गावातुन सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा धडाका, गाव भेट दौरे, संवाद यात्रा, आरोग्य शिबीरे, लोकांना आर्थिक मदतीचा हात सुरू केला आहे त्यामुळे तेच भाजपचे प्रमुख दावेदार ते मानले जात आहेत. त्यांना तसा शब्द दिल्याने भोरच्या जनमानसात त्यांचीच मात्र मोठी चर्चा आहे.
जीवन कोंडे यांनीही आपणही कोठे कमी पडत नसल्याने इच्छा व्यक्त केल्याचे लोकांकडून सांगितले आहे. तसेच लोकसभेला ऐन मोक्याच्या वेळी ठाकरे गटातुन शिंदे गटात गेलेले कुलदीप कोंडे यांनीही गतवर्षीप्रमाणे आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचे म्हणत काम सुरू केले आहे. मुळशीतुनही शिवसेनेच्या शिंदे गटातुन बाळासाहेब चांदोरे यांनीही आपल्या विकासकामाची गाथा पुस्तिका गावोगावी ,वाडी- वस्त्यांवर पोहचवत यावेळी आपण उमेदवार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेहमीच चर्चेत राहिलेले रणजित शिवतरे मात्र यावेळेस चंग बांधून मैदानात उतरणार आहे. त्यांच्या गावभेट दौरा व जनसंवाद दौ-यातुन विकास कामे मंजूरी यातून सिध्द झाले आहे. रणजित शिवतरे व संग्राम थोपटे अशी दुरंगी लढत झाली तर मात्र अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत. तसेच अ प राष्ट्रवादीचे जेष्ठ चंद्रकांत बाठे, माजी आमदार स्व. काशिनाथ खुटवड यांचे सुपुत्र विक्रम खुटवड हेही इच्छुकांमध्ये असणार आहेत असे जनमानसात बोलले जात आहे.
भाजपचे समीर घोडेकर यांनीही थोपटेंविरोधात उपोषण करून एक जनसेवक इच्छुक असल्याचे सांगितले आहे .यावेळी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने अजित पवार हे संग्राम थोपटेंना पाडण्यासाठी नवा डावपेच आखत नवी खेळी करणार हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत दिसत आहे. महायुतीत जागा वाटपात या मतदारसंघात जास्त इच्छुक उमेदवार असल्याने मोठी बंडखोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विजयासाठी संग्राम थोपटे सज्ज
तीनही तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू ठेवत आपल्या कुटुंबा समवेत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विजयासाठी संग्राम थोपटे सज्ज आहेत. जर दुरंगी लढत झाली तर थोपटेंचा कसं लागणार पण चौरंगी ,पाच सहा उमेदवारात लढतीत पुन्हा थोपटेच विजयाचा चौकार मारणार असे जाणकारांच्या मते असे सांगण्यात आले आहे. कारण सन २००९ ला तिरंगी लढतीत १८५८० ,२०१४ ला चौरंगी लढतीत १८९५१ तर २०१९ ला दुरंगी लढतीत मात्र ९२०६ मतांनी संग्राम थोपटे निसटते विजयी झाले होते.
सोशल मीडियावर मात्र….
सोशल मीडियावर मात्र भोरची एमआयडीसी , बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था, वीजेचा खोळंबा, आरोग्य समस्या, खड्डेमय-जलमय भोरचे निकृष्ट बसस्थानक, तरुणांचा बाहेरगावी कामासाठी जाणारा लोंढा ,वाढणारी गुन्हेगारी, अवैध धंदे, विस्कळित वाहतूक व्यवस्था, शहरातील पाणी समस्या, बंद पडत असलेले उद्योग धंदे यांचे सोशल मीडियावरील विद्यमान आमदार खासदारां विरोधातील व्हिडिओ, बॅनर, रिल्स बनत असल्याने तरूणांचे हे सोशलवॉर या मतदार संघात कोणाच्या पथ्यावर पडणार ? कोणाला फायदा होणार ? कोण फायदा घेणार? कोण होणार भोरचा आमदार? महायुती की महाविकास आघाडी ?याचे चित्र आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे हे दिसत आहे.