वारजे माळवाडी व फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह गंभीर गुन्हे करून दहशत माजविणार्या शेखर रविंद्र खवळे (वय २३, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे-माळवाडी, पुणे) याच्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून, स्थानबद्ध केले आहे. एमपीडीए अन्वये पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ४३ कारवाया केल्या आहेत.
वारजे माळवाडी व फरासखाना ठाण्यांच्या हद्दीत शेखर खवळे हा कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे, विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याच्यावर गेल्या ५ वर्षांमध्ये ४ गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.