बारामतीः येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या (bajaran dal) कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्याने या दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्वजण दंग असताना त्या ठिकाणी कार्यकर्ते आले आणि त्यांनी स्टेजवर येत माईकवरुन कार्यक्रम बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. यामुळे दांडियाच्या कार्यक्रमात दंग असलेल्यांचा हिरमूड झाला. या घटनेवर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही. हे ‘मोरल पोलिसींग’ यापुर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. असल्याचे सुळे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलीसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.