खंडाळाः खंडाळा तालुक्यातील बावडा येथील जवान अमर शामराव पवार (वय 36) यांना छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीर मरण आले असून, तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी येणार त्यांच्या बावडा मूळ गावी येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, सात वर्षाचा मुलगा, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे.
शहीद अमर पवार हे बावडा येथील शेतकरी कुटुंबातील आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये ते कार्यरत होते. शनिवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाले होते. यामधील दोघेजण गंभीर होते. त्यामध्ये बावड्यातील अमर पवार यांचा समावेश होता. जखमी जवानांना सैन्य दलाने कस्तुरमेटा कॅम्पमधून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रायपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अमर पवार यांना वीरमरण आले.
मनमिळावू अमर हरपला
अमर पवार यांच्या स्वभाग अत्यंत मनमिळावू होता. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण बावडा येथे झाले. 2010 मध्ये ते सैन्य दलात आयटीबीपीमध्ये भरती झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणारे अमर सर्वांचे लाडके होते. ते शहीद झाल्याची बातमी कळताच बावडा गावासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.