वाठारः झाडे लावा, झाडे जगवा! हा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार हि. मा. येथे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांच्या हस्ते झाडांचे पूजन करुन झाडांना राखी बांधून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पर्यावरणपुरक रक्षाबंधन सण साजरा केला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीनुसार झाडे, वेली, पशू आणि पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत. इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. माणसांप्रमाणेच झाडांनाही संगीत आवडते. वाठार हि. मा. शाळेच्या आवारात एक पिपरण वृक्ष आहे. या वृक्षाला राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा करून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. या प्रसंगी उत्रौली केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापक रमेश कुंभार, शिक्षक विठ्ठल आखाडे, निलीमा शिंदे, केदारनाथ परमहंस आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
पिपरण वृक्ष शाळेचाच एक भाग
या वृक्षावर चिमणी, कावळा, तांबट, बुलबुल आदी पक्ष्यांची घरटी केलेली आहेत. अधूनमधून पंढरपूरी चिमण्या, भारद्वाज पक्षी तसेच निळया रंगाच्या ख॔ड्या पक्ष्याचेही दर्शन घडते. उन्हाळ्यात झाडावर छोटी छोटी फळे येतात. फळे खाण्यासाठी झाडावर पक्ष्यांची गर्दी होते. झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट तर शाळेत मुलांचा चिवचिवाट सुरू असतो. हा पिपरण वृक्ष शाळेचाच एक भाग बनलेला आहे. रोज सकाळी शाळेत आल्याबरोबर मुले झाडाच्या अवतीभोवती खेळत असतात. दुपारच्या सुट्टीत झाडाखाली बसून पाढे पाठांतर करणे, कविता पाठांतर करणे पाठवाचन करणे, गाण्यांच्या भेंड्या खेळणे इ.मध्ये मुले रमून जातात. या पिपरण वृक्षाच्या थंडगार सावलीमुळे कडक उन्हाचा त्रास जाणवत नाही.