भोर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारीचे प्रतीक असलेला ‘एबी फॉर्म’ मिळण्याचाही आजच अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज काहींच्या नशिबी आनंद, तर अनेकांच्या वाट्याला निराशा येण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला होता. इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने नेत्यांवर योग्य उमेदवार निवडण्याची मोठी जबाबदारी आहे. एबी फॉर्म म्हणजेच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणे हे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत कोणाच्या नशिबी हा फॉर्म येणार, हे सांगणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी बी फॉर्म देऊनही पक्षांनी वेळकाढूपणा केल्याचे चित्र आहे, तर काही इच्छुकांना थेट नाराज केले जाणार असल्याची चर्चा आहे.
भोर तालुक्यात या नाराजीचे पडसाद अधिक तीव्र स्वरूपात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक अनुभवी नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार तिकीट न मिळाल्यास बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याची माहिती समोर येत आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्याचे टाळले असले, तरी अनेक उमेदवारांनी आधीच अपक्ष म्हणून, तर काहींनी पक्षाचे नाव लावून अर्ज दाखल केले आहेत.
मात्र, अंतिम क्षणी एबी फॉर्म कोणाच्या हाती येतो, यावर संपूर्ण राजकीय गणित अवलंबून आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर अनेक अपक्ष उमेदवार माघार घेतील, तर काही जण बंडखोरी कायम ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस केवळ अर्ज दाखल करण्यापुरता मर्यादित न राहता, भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणारा ठरणार आहे.
एकंदरीत, आज खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांची ताकद, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाची कसोटी लागणार असून, भोर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.














