भोर – यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून पाऊस उघडण्याचे नावच घेत नाहीये दिवसा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी,तर रात्रीतही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांनी आता ” जारे जारे पावसा, तुला देतो पैसा “अशी आर्त हाक पावसाला वरुणराजाला बळीराजाने दिली आहे .
मागील काही दिवसापासून वारंवारच्या अवकाळी पावसाने राजरोसपणे हजेरी लावल्याने शेतकरी मात्र पावसाने मेटाकोटीला आला आहे. बऱ्याच लोकांचे अजूनही सोयाबीन काढणे वाचून वाया चालले असून तेच सोयाबीन खाचरात खराब होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. फुले प्रगती , एरंड्या जातीचे भुईमूग काढणीला आले आहेत. पावसाची उघडीप नसल्याने हेच भुईमूग शेतात पुन्हा उगवू लागले आहेत. काही ठिकाणी हळव्या जातीच्या भात वाणे काढण्यासाठी आलेली आहेत यामध्ये रत्नागिरी चोवीस ,कोळंबा, रत्ना, शाहिनी, शान, पार्वती, रसिका, इंडम अशी वेगवेगळ्या जातीची हळवी भाते काढणीसाठी आली आहेत. ज्या ठिकाणी अगोदरची भात लावणी झाली आहे अशा ठिकाणची इंद्रायणी भात काढण्यासाठी आले आहेत. कधीतरी कडक उन पडत असुन या उन्हात शेतकरी शेतीच्या कामासाठी लगबगीला आला आहे. जादा वारंवारच्या होणा-या पावसाने भात उंचावले असुन आडवे पडले आहे. त्यामुळे आडवे झालेले भात झडुन जात आहे. तालुक्यात इंद्रायणी भाताचा सूवास जरी दरवळत असला तरी या भाताला उन्हाचीही आवश्यकता असुन पावसाने आता पुर्ण उघडिप घ्यावी असे शेतकरी सांगत आहे. काही ठिकाणी भात पिकावर करपा तांबेरा पडल्याने भात पीक पुर्णपणे वाळुन करपटले आहे.


















