शिक्रापूर/शेरखान शेख
सणसवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका नामांकित कंपनीने काही झाडांची कत्तल करुन बारा देशी झाडे रस्त्याखाली गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार शिरुर वनविभागाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील प्रसिद्ध कंपनीने त्यांच्या हद्दीतील काही झाले तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली होती. त्यानुसार या प्रकरणी वनविभागाने जून २०२३ मध्ये पंचनामा करुन येथील ५१० झाडे तोडण्याची परवानगी देऊन लिंब, फिकस, नारळ यांसारख्या २३६ देशी झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबत परवानगी दिली होती. त्याबाबत बंधपत्र सादर करुन घेतले होते. मात्र, कंपनीने काही झाडांचे पुनर्रोपण केले नसल्याचे समोर आले आहे.
कारवाईत धक्कादायक माहिली आली समोर
तसेच काही झाडांवर पक्षांची घरटी, घरट्यामध्ये अंडी असल्याने या कंपनीवर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कंपनीमध्ये जाऊन पंचनामा करत पाहणी केली. या पाहणीमध्ये कंपनीने लिंबाच्या बारा झाडांची कत्तल करुन बारा देशी झाडे येथील रस्त्याखाली गाडल्याचे उघड झाले आहे. यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल का करु नये, याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस वनविभागाच्या वतीने बजावण्यात आली असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावून कारण दाखवण्यासाठी हजर राहण्याची वेळ देण्यात आल्यानंतर कंपनीचे नवीनच व्यक्ती हजर झाले होते. ज्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती, त्यामुळे कंपनीला पुन्हा वेळ देऊन ज्यावेळी याबाबत परवानगी दिली. त्यावेळी असलेल्या लोकांनी उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले आहे.
-प्रताप जगताप (वनपरिक्षेत्र अधिकारी)