भोरः भोर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाने ऐन वेळेस ठाकरे गटाकडून आयात केलेले उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते नाराज झाले आहेत. यामुळे शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मांडेकर आणि कोंडे दोन्ही उमेदवारांकडून शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आली.
अर्ज भरण्यासाठी कुलदीप कोंडे(अपक्ष) आणि शंकर माडेकर(राष्ट्रवादी अजित पवार) यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तहसिल कार्यालयासमोर मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. युतीकडून शिवसेना उबाठाकडून ऐनवळी आयात केलेल्या उमेदवार शंकर मांडेकर यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडल्याने रांगेत असलेल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. या नाराजीमधून शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार करीरत उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर झळकवण्यात आले. घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही वेळ येथल्या वातावरणात तणाव निर्माण झाला होता.