भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीला शेकडो तरुण उपस्थित राहिले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
स्वातंत्र्यापासून आजवर तालुक्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. आजवर कोणीही राजगड तालुक्याच्या हक्कासाठी भांडले नाही, लोकप्रतिनिधींना प्रश्नही विचारला नाही, पण आम्ही राजगडकर आमच्या हक्कासाठी एकत्र आलोय आणि येत्या काळात प्रस्थापित नेत्यांना त्यांच्या कामाचा हिशोब आम्ही मतदार मतदानाच्या पेटीत घेऊ, असा इशारा या तरुणांनी दिला आहे.
राजगड (वेल्हे ) तालुक्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवली आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, तालुक्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आणि यातूनच सगळ्यांनी ठामपणे बदलाची भूमिका मान्य केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बैठकीमधील परिवर्तनाचे प्रमुख विषय:
१ पायाभूत सुविधा
२ शिक्षण विकास
३ आर्थिक संधी
४ सामाजिक एकता
५ पर्यटन व रोजगार संधी
६ कृषी व ग्रामीण विकास
७ आरोग्य सेवांचा विकास
या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. राजगडच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत आपल्या आवाजाला गती देऊन एकत्र येण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.