बारामती: प्रतिनिधी सनी पटेल
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. सध्याची परिस्थिती अशीच आहे. बारामतीच्या ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाला देखील या आजाराची लागण झाल्याचे चित्र येथील ग्रामीण भागात पाहिला मिळत असून, यामुळे आरोग्य विषयक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
बारामतीच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून, ग्रामीण भागात असणारे शासकीय रुग्णालयांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामीण भागात राहणाऱ्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात होत असलेली अस्वच्छता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत यांनीही याकडे तातडीने लक्ष देऊन आरोग्य संदर्भातील उपाययोजना गावपातळीवर राबविण्यात याव्यात. तसेच दवंडी पिटवून ग्रामस्थांना याविषयी जागृत करावे अशी देखील मागणी करण्यात येत आहे.
डेंग्यूमुळे अनेक युवकांचे प्राण गेलेले आहे. यामुळे या आजाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एकाच घरात एकावेळी चार ते पाच जणांना डेग्यूंची लागण होत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. येथील ग्रामीण भागात अनेक शासकीय रुग्णालय आहेत, पण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पुरेशी संख्या नाही, अशी काही ग्रामीण भागातील स्थिती आहे. यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे डेंग्यूचे प्रमाण कमी कसे होईल यासाठी उपायोजना राबविण्याची गरज आहे. तसेच आरोग्य सेवक किंवा पंचायत समितीमधील आरोग्य अधिकारी यांनीही तातडीने याकडे लक्ष देऊन काय उपयोजना करता येतील हे पाहणे गरजेचे असल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.