उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर प्रमाणेच उरुळी कांचनसाठीही स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे, हे येथील ग्रामस्थांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक कार्यालयात उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या असून, गणेशोत्सवानंतर म्हणजेच एक ऑक्टोबरपासून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे कामकाज सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनीही गणेशोत्सवानंतर कोणत्याही क्षणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे कामकाज सुरु होण्याच्या शक्यतेस दुजोरा दिला आहे. नियोजित पोलीस स्टेशनमध्ये काम करु इच्छिणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयाने मागवल्याची माहिती अंकीत गोयल यांनी “पुणे प्राईम न्यूज”ला दिली. उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असे स्वप्न उरुळी कांचनचे ग्रामस्थ मागील २०-२५ वर्षांपासून पाहत आहेत. याबाबतचा प्रस्तावही मागील काही वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित आहे. मात्र, या प्रस्तावाला आता गती आली असून, नजीकच्या काळात उरुळी कांचनमध्ये नवीन पोलीस स्टेशन अस्तित्वात येणार आहे. नियोजित उरुळी कांचन पोलीस स्टेशनमुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशनवरील मोठा भार कमी होणार आहे. शिवाय उरुळी कांचन व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहण्यास मदत होणार आहे.