पुणे: दिवाळीच्या तोंडावर स्वारगेट बस स्थानकाच्या बाहेरील आऊटर गेटवर एका रिक्षाचालकार धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या घटनेत रिक्षाचालक गंभीरित्या जखमी झाला आहे. सदर घटना भरदुपारी घडल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
या हल्यात जैन उद्दीन शाहजू भाईजान (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत हुसेन खान्दान (वय ४३) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अंड्या उर्फ अनुप पासलकर व युवराज (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन हे रिक्षा चालक आहेत. ते स्वारगेट परिसरात रिक्षा चालवितात. त्यांची व आरोपींची दोन दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. दुपारी जैन हे नेहमीप्रमाणे बस स्थानकाच्या आऊट गेटवर थांबले होते. तेव्हा दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी कालच्या भांडणाचा मुद्दा पुन्हा काढत जैन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
जैन यांना काही समजण्याच्या अगोदरच दोघांनी कंबरेला लावलेले कोयत्यासारखे हत्यार बाहेर काढून त्यांच्या डोक्यात तसेच हातावर सपासप वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर दहशतीसाठी या दोघांनी जैन यांच्या रिक्षाची काच देखील फोडली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
पोलिसांचे दुर्लक्ष?
दिवाळी सण तोंडावर आला असून, त्यामुळे स्वारगेट तसेच शहरातील आदी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. या काळात गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांना मोकळे रान मिळते. पोलिसांची यावर करडी नजर असायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वारगेट बस स्थानकात मार्शलची ड्युटी आहे. बंदोबस्त व पेट्रोलिंग देखील असते. त्यानंतरही मारहाणीसारखा गंभीर प्रकार घडल्याने गस्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.