शिरवळ: शिरवळ जिल्हा परिषद गटात आज मोठी आणि खळबळजनक राजकीय घडामोड घडली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नितीन भरगुडे-पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून शिरवळ परिसरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी विविध विकासकामांत सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय डावपेचांमुळे ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली.
आज त्यांनी पळशी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अर्चना चंद्रकांत यादव यांच्यासह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या शक्तीप्रदर्शनामुळे शिरवळ व पळशी परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, भाजपची ताकद दाखवणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याचे बोलले जात आहे. अर्चना यादव या स्थानिक पातळीवर सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या उमेदवारीला नितीन भरगुडे-पाटील यांच्या प्रवेशामुळे बळ मिळणार आहे.
या घडामोडीमुळे मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिरवळ जिल्हा परिषद गट हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, भरगुडे-पाटील यांच्यासारख्या वजनदार नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, शिरवळ गटातील लढत आता अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे. भाजपसाठी ही मोठी ताकद वाढ ठरणार की विरोधकांना नव्या रणनीती आखाव्या लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















