शिरवळ: भाग १
कोलकत्यामधील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बदलापूर येथील चिमुकलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संबंध राज्यभर पसरल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत तसेच छेडछाडीबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ भागात देखील मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढण्यात आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे मुलींमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलापूर घटनेनंतर राज्य शासनाने शाळा व महाविद्यालयासंदर्भात नियमावली आखून दिली असून, त्याची पूर्तता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्याची अमंलबजावणी आजतायगात किती शाळांनी केली आहे, हे पाहणे देखील अत्यंत गरजेचे आहे. खंडाळा तालुक्यात आणि पर्यायाने शिरवळ भागात अनेक नामांकित शाळा व महाविद्यालय आहेत. या शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या मुली येत असतात. मात्र, काही रोड रोमिओकडून मुलींची छेड काढण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अंदाजे अशा प्रकारची ६ प्रकरणे समोर आली होती. तसेच समोर न आलेली अनेक प्रकरणे देखील असू शकतात, असे देखील बोलले जात आहे. शिरवळ भागातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. मुलीना या गोष्टीचा त्रास सहन न झाल्यामुळे तिने वडिलांनी याबाबत सांगितले. यानंतर संशयित आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर येथील एका महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यींनीची छेड काढण्यात होती. हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मिटविण्यात आले.
या भागात टवाळखोरीने डोकं वर काढले असून, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची छेडछाडीची प्रकरणे समोर आल्यानंतर पोलीस प्रशानसनाने तत्परतेने निर्भया पथकास पाचारण करुन शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधून, असे काही घटत असल्यास त्यावर रोख लावणे गरजेचे आहे. पण तसे होताना दिसत नाही. तसेच येथील भागात असणाऱ्या शाळा व महाविद्यालय प्रशासनाने देखील यावर रोख लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे पाहणे गरजे आहे. पण तसे देखील होताना दिसत नाही. टवाळखोर, रोड रोमिओ यांच्यामुळे विद्यार्थ्यींनीमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले असून, या प्रकारास अटकाव घालण्यासाठी तसेच खबरदारी घेण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शाळा, महाविद्यालय प्रशानसनाने उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? याबाबत पोलिसांशी संपर्क साधल असता संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी महाविद्यालयात सुरक्षा गार्ड नेमणे गरजेचे असून, शाळा व महाविद्यालयांमध्ये निर्भया पथकाचे राऊंड होणे गरजेचे आहे.
क्रमश…..