शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे गावच्या हद्दीतील असलेल्या न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली. या धडकेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३) वर्षे, रा. न्हावरे ता. शिरूर,जि. पुणे हे गंभीर जखमी झाले असून, कंटेनर चालक पळून गेल्याने नितीन दत्तात्रेय हांडे (वय ३२) यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ शिरुर बाजुकडून भरधाव वेगाने आलेला कंटेनरने रस्त्याच्या कडेने पायी चाललेल्या विठ्ठल नारायण निंबाळकर यांना पाठीमागून जोराची धडक बसल्याने अपघात होवून या अपघातात त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेल्याने अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.