भोर | तालुक्यातील पूर्व भागात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, स्वघोषित उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्हे तर केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी अनेक जण रिंगणात उतरत आहेत. “हवशे, नवशे आणि गवशे” अशी नव्या पिढीतील राजकारण्यांची त्रिसूत्री आता ग्रामीण भागात ठळकपणे दिसून येत आहे.
पूर्व भागात काही स्वघोषित नेते ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’, ‘भावी सभापती’, ‘कार्यसम्राट’, ‘जनसेवक’ अशा पदव्या स्वतःच लावून सोशल मीडियावर प्रचार सुरू करत आहेत. प्रत्यक्षात जनतेशी त्यांचा संपर्क नगण्य असून, काहींचा तर विकासकामाशी दूरचा संबंधही नाही. मात्र माध्यमांवर स्वतःचे कौतुकात्मक वृत्त प्रसिद्ध व्हावे यासाठी काहीजण दबाव टाकताना दिसत आहेत. काही पत्रकारांवर फोन, संदेश, व शिफारसीद्वारे आपले फोटो व बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी आग्रह धरण्याचे प्रकार वाढले आहेत.
स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीची लाट या पार्श्वभूमीवर उमटू लागली आहे. “काम काही नाही, पण नाव गाजवायचं” या भूमिकेमुळे खऱ्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गावात गेल्यावर जनतेच्या समस्या समजून घेण्यापेक्षा सेल्फी आणि पोस्ट याकडेच जास्त लक्ष देणारे काही ‘सोशल मीडिया नेते’ आज राजकीय चर्चेचा विषय बनले आहेत.
आगामी निवडणुकीत अशा प्रसिद्धीपिपासूंची संख्या वाढल्यास मतदारांसमोर खरी व खोटी ओळख पटवण्याचे आव्हान उभे राहील. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी नाव नव्हे तर काम महत्त्वाचे असते, हे जनतेने आता ओळखण्याची वेळ आली आहे. स्वघोषित नेत्यांच्या या ‘प्रसिद्धीच्या स्पर्धे’मुळे पूर्व भागातील राजकारणाला नवीन पण गोंधळलेले वळण मिळाले आहे.













