शिक्रापूर/ शेरखान शेख
गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तदात्यांना रक्त मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गरज ओळखून तसेच सामाजिक भाव जपत संकल्प फोर्जिंग कंपनीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
करंदी येथील संकल्प फोर्जिंग कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याचा विचार करत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर राबवण्याचा संकल्प केला. त्यांनतर कंपनीचे व्यवस्थापक कपिल यादव, धोंडीराम खरात, दत्तात्रय ढमढेरे यांसह आदींच्या पुढाकाराने पुणे येथील पुणे ब्लड बँकेच्या माध्यमातून कंपनीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कंपनीच्या कामगारांनी रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद देत कंपनीतील तब्बल १०५ जणांनी रक्तदान केले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक कपिल यादव यांनी सर्व रक्तदाते कामगारांचे आभार मानले.