राजगडः स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विना परवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. तसेच संबंधिताची अंगझडती पोलिसांनी घेतली असता त्याच्याकडे तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईमध्ये हस्तगत केला आहे.
पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, याचा तपास पोलीस करीत आहेत. सदर कारवाई ही अभिजीत सावंत, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस हवालदार रामदास बाबर, तुशार भोईटे,अमोल शेडगे, मंगेष भगत, पोलीस शिपाई सागर नामदास असे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी वाहनाने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संकेत चोरघे, रा. कोळवडी ता. वेल्हा जि पुणे हा दिडघर गावी येणार असून त्याच्याकडे बेकायदा गावठी पिस्तुल असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलिसांनी दिली. त्यानुसार अभिजित सावंत, पोलीस उपनिरीक्षक यांनी अविनाश शिळीमकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवून पोलीस कर्मचाऱ्यांना दिडघर गावाच्या हद्दीत नसरापुर- वेल्हा येथे बोलावले. संकेत चोरघे हा एसटी बसची वाट पाहत असलेला पोलिसांना दिसला.
त्यावेळी पोलिसांना पाहून चोरघेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने संकेत गोरख चोरघे, वय 21 वर्ष, रा. कोळवडी ता. वेल्हा जि. पुणे यास ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे पिस्तुल बाळगण्याचे लायसन्स आपल्याकडे नसल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाईसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.