नसरापूर: एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याचे पहिले लग्नाच्या पत्नीला सोडून दिल्याची गोष्ट लवपून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहित महिला पुढे येऊन तिने आपल्या सासरी येत राजगड पोलीस ठाण्यात नवरा व सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवरा व सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
छळ करणारा नवरा अजिंक्य बंडू कुटे (वय ३३), सासरा बंडू धोंडू कुटे (वय ६१), सासू भारती बंडू कुटे (वय ५५), रा. तुंगाली लोणावळा ता. मावळ, नणंद प्रजा मंगेश दळवी (वय ३७), नणंदेचा नवरा मंगेश शंकर दळवी (वय ३७ दोघेही रा. भांगरवाडी लोणावळा ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२३ रोजी तक्रारदार आणि अजिक्यं कुटे याच्यांशी लग्न झाले होते. यावेळी पतीने त्याच्यातील शारीरिक कमजोरी लपवून फिर्यादी विवाहितेची फसवणूक केली. तसेच माझ्यावर उपचार सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेली. या दरम्यानच्या काळात नवऱ्यासह सासरे, सासू, नणंद व नणंदेचा नवरा यांनी विवाहितेला ‘माहेरहून पैसे घेऊन ये, तुझ्या आई-वडीलांना प्रॉपटींमधील २५ टक्के हिस्सा माग,’ असे म्हणून छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच विवाहितेच्या नणंदेचा नवऱ्याने वाईट हेतूने नजर ठेऊन विनयभंग करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. सासरच्या या सर्वांनी शारीरिक व मानसिक छळ करून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून त्रास दिल्यानंतर विवाहितेने अखेर माहेरी येऊन याबाबत राजगड पोलीस ठाण्यात या सर्वांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी नणंदेचा नवरा मंगेश दळवी याच्यावर विनयभंग तर सासरच्या व्यक्ती विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, मारहाण, शिवीगाळ दमदाटी आदी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या काळात तपास करताना विवाहितेचा नवरा अजिंक्य कुटे याने या लग्नाअगोदरच १८ जानेवारी २०२२ रोजी आळंदी येथे एक लग्न केले होते. ही बाब दुसरी पत्नी व तिच्या आई-वडिलांपासून लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याबाबत पोलिसांनी त्याच्या विरोधात वाढीव कलम ४९४ लावून अजून एक गुन्हा दाखल केला आहे.