दत्तात्रय कोंडे! राजगड न्युज
खेड शिवापूर : पुणे सातारा महामार्गावरील शिवापूर वाडा येथील आकांक्षा ज्वेलर्स मधील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील फरार संशयिताच्या राजगड मुसक्या आवळल्या असून निलेश पांडुरंग डिंबळे(वय ३० वर्ष, रा. कल्याण, ता.हवेली) असे अटक संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिवापूर वाडा येथील आकांक्षा ज्वेलर्स चे मालक यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर ता. हवेली जि. पुणे) यांच्याकडील एकूण ६,५८,००० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत त्यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविली होती. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी कसून तपास करून सदर गुन्ह्यातील ७ आरोपी पैकी रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५ वर्षे, रा. सहकारनगर, पुणे), निखिल भगवंत कांबळे (वय २८ वर्षे, रा. आई माता मंदिर, अप्पर पुणे), निलेश दशरथ झांजे (वय २५ वर्षे, रा. वडगाव झांजे ता. वेल्हे जि. पुणे), शफीक मकसूद हावरी (वय १९ वर्ष रा. इंदीरानगर कुंभारवाडा), साहिल हनीफ पटेल (रा.लक्ष्मीनगर पुणे) यांना यापूर्वी सदर गुन्ह्यात अटक केले होते.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश डिंबळे हा कित्येक दिवस राजगड पोलिसांच्या ‘हातावर तुरी’ देत होता. राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हा एका कार्यक्रमानिमित्त त्याच्या कल्याण(ता.हवेली) गावी निघालेला आहे. त्यांनी लगेचच ही माहिती पोलिस उपनिरिक्षक दाजी देठे यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार अजित माने आणि राहुल कोल्हे यांच्या समवेत जाऊन रांजे (ता.भोर) येथील चितळे कंपनी जवळ सापळा रचून निलेश डिंबळे यांस शनिवारी(दि. १७) दुपारी १ वाजता ताब्यात घेतले. राजगड पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस अंमलदार अजित माने आणि राहुल कोल्हे यांच्या पथकाने केली.