नसरापूर: राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात देखील अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. येथील परिसरातील असलेल्या महाविद्यालय, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवरुन शिक्षण घेण्यासाठी मुली येतात. शाळेच्या तसेच महाविद्यालयाच्या रस्त्यावर अनेक रोडरोमिओ फिरताना दिसत आहेत. अशा मोकाट फिरणाऱ्या रोडरोमियांवर पोलिसांचा दंडुका चालविणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्ररप्रांतिय देखील वास्तव्यास आहेत. त्यांचे माहिती संकलित करणे गरेजेचे आहे, या आणि अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने शिवसाम्राज्या प्रतिष्ठानमधील युवकांनी याबाबत राजगड पोलिसांना निवेदन दिले आहे.
राज्यात कित्येक ठिकाणी बाल लैंगिक छळ होत आहेत व बलात्काराचे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. नसरापूर गावातील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानमधील युवकांनी आपल्या नसरापूर भागामध्ये असा कोणताही गुन्हा होऊ नये, यासंदर्भात राजगड पोलिसांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली आहे.
नसरापूर भागातील महाविद्यालये व शाळा आहेत, त्या भागातील काही रोडरोमिओ रस्त्यावर महाविद्यालय व शाळा सुटण्याच्या वेळेला फिरतात. अशा मुलांवर आई-वडिलांना बोलवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिव साम्राज्य प्रतिष्ठान यांनी केलेली आहे. तसेच परप्रांतीय आपल्या भागामध्ये कामासाठी आले असतील व भोर तालुक्यात भाडेतत्त्वावर राहत असतील अशा लोकांचे पोलीस व्हिरिफिकेशन होणे खूप गरजेचे आहे. याने पोलिसांना गुन्हेगार शोधण्यामध्ये मदत होईल, असे निवदेनात म्हटले आहे.
पोलीस बुथ उभारण्याची मागणी
राजगड पोलीस स्टेशनला विनंती केली आहे की चेलाडी चौकातील ब्रिज खाली छोटेसे पोलीस बुथ व्हावे, जेणेकरून चौकात होणाऱ्या अपघात व होणारे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल, असे पत्र देण्यात आले आहे. राजगड पोलीस स्टेशन ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चेलाडी चौक नसरापूरचे अध्यक्ष प्रज्योत कदम, उपाध्यक्ष सुरज भगत, सचिव विशाल शिंदे, अभिषेक वाईकर, नवनाथ कचरे, ओंकार चोरघे, निखिल भंडारी, प्रतिक कोंढाळकर हे सर्वजण उपस्थित होते.