राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते येथील गावांतील नागरिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी केलेल्या भाषणात मांडेकर यांनी गेले कित्येक वर्ष सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या नाहीत. यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी स्वःताचे गाव सोडण्याची वेळ असल्याची घणाघाती टीका संग्राम थोपटे यांच्यावर केली.
राजगड तालुका दुर्गम असल्याने गेल्या ५० वर्षात या ठिकाणी मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज इथले सत्ताधारी देऊ शकले नाहीत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तालुका विकासापासून वंचित राहिला असल्याचे देखील मांडेकर यावेळी म्हणाले. यामुळे विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे असून, मतदारांनी संधी दिल्यास पुढच्या पाच वर्षात कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून विकास करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी येथील मतदारांना दिला.
या दौऱ्यात मांडेकर यांच्या समवेत रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे हे महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.