पुरंदर: तालुक्यातील साकुर्डे व पिंगोरी परिसरातून गुटख्याच्या उत्पादनासाठी खैराची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती आहे.
सासवडचे प्रभारी वन प्ररिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले की, गुटख्याच्या उत्पादनासाठी खैराची मागणी वाढली असून, याच कारणामुळे साकुर्डे येथील डोंगरातून मोठ्या प्रमाणावर खैराची झाडे तोडली जात आहेत. शिवसेना युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख तुषार हंबीर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी घटनास्थळी 12 ते 16 जणांचा एक गट खैराची झाडे तोडत असताना आढळून आला. या गटाने झाडे तोडण्यासाठी एक तंबू उभारला होता आणि महिन्याभर पुरेल असे धान्य साठवून ठेवले होते. यावरून हा गट काही काळापासून या परिसरात सक्रिय होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांची मदत?
या बेकायदेशीर वृक्षतोडीसाठी स्थानिकांची मदत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊनही वन विभागाला याची कल्पना नसणे हा गंभीर प्रश्न आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे पुरंदर तालुक्यात वन विभागाची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.