भोर\पुरंदर | पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला राजगड आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले. संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज, खेड शिवापूर टोलमार्गे चेलाडी-नसरापूर ब्रीजपर्यंत पाठलाग केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला वेग आला आहे.
पानवडी येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) या वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गायी-बैल घेऊन जाण्यावरून झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. राजगड आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत संशयिताचा माग काढला. येरवड्यापासून सुरू झालेला पाठलाग लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज आणि खेड शिवापूर टोलमार्गे चेलाडी-नसरापूर ब्रीजपर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले, तुकाराम राठोड, सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार औदुंबर आडवाल, राहुल पठाडे, समीर भालेराव, पप्पू शिंदे, काळे, सोनवणे, लोंढे, शेंडे, मखरे तसेच पोलीस शिपाई अनिकेत सोनवणे, चारुदत्त देशमुख, राऊत, हिप्परकर, चव्हाण आणि कुमावत यांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत. संशयिताच्या चौकशीतून हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
INSAS रायफल रोखून संशयिताला घेरले
या कारवाईत राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मचले आणि राठोड यांच्यासह पोलीस शिपाई भडाळे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलीस शिपाई भडाळे यांनी संशयितावर INSAS रायफल रोखली. राजगड आणि सासवड पोलिसांनी समन्वयाने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.










