पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, ही घटना ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान घडली असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. पीडितेला सायबर फसवणूक करणाऱ्यांचा कॉल आला होता. यामध्ये पीडितेला तिच्या नावावर 12 बनावट एटीएम कार्ड, बनावट पासपोर्ट आणि 140 ग्रॅम एमडी ड्रग्ज असलेले पार्सल मलेशियाला पाठवले गेले आहे. असल्याची बतावणी करण्यात आली. तसेच सायबर चोरट्यांनी पीडितेला अटक करण्याची धमकी देऊन पोलिसांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला दुसरा एक कॉल आला. त्यामध्ये दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचे सांगण्यात आले. मनी लाँड्रिंग तपासण्यासाठी पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले आणि आरबीआयमध्ये पैशाची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार, पीडितेने आरोपींनी प्रदान केलेल्या वेगवेगळ्या UPI आयडीवर तब्बल 2 लाख रुपये ट्रान्सफर केले.
पीडितेला पुन्हा एक कॉल आला. ज्यामध्ये कॉलरने पीडितेला थर्मल इमेजिंग करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच ड्रग्सचे सेवन केले आहे किंवा तिच्या शरीरात कोणतेही ड्रग लपवले आहे का, हे तपासण्यासाठी तिला कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात सुमित विश्रा, सुनिल कुमार आणि अनिल यादव यांनी संगनमताने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास अरूण घोडके, पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.