पुणे : बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बावधन बुद्रुक येथील के.के. कन्स्ट्रक्शन येथे बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. हेरिटेड एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
बावधन भागामध्ये ऑक्सफर्ड गोल्फ अँड काऊंटी नावाचे रिसॉर्ट असून तिथे एक हेलिपॅड आहे. याच हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहूच्या दिशेने उड्डाण घेतले होते. मात्र पहाटेच्या सुमारास धुके जास्त असल्याने डोंगराळ भागात हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला. यात दोन पायलटसह एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला.
हेलिकॉप्टर अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते आणि तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांची ओळख पटलेली नाही. पुणे कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिन्याभरातील दुसरी घटना
दरम्यान, हेलिकॉप्टर कोसळण्याची महिन्याभरातील ही दुसरा घटना आहे. याआधी 24 ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील पौड जवळ हेलिकॉप्टर कोसळून तीन जण जखमी झाले होते.