भोरः पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्विकारताना एसबीने रंगेहाथ पकडले आहे. थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी रांझे गावात वीस गुंठे जागा खरेदी केली होती. तक्रारदार यांच्या नावावर सदर जागेची ऑनलाईन फेरफार नोंद ग्राह्य धरण्यासाठी व सातबाऱा उता-यावर नोंद घेण्यासाठी तक्रारदार हे तलाठी सुधीर तेलंग यांना भेटले असता, तेलंग यांनी प्रत्येक गुंठ्यास एक हजार रुपये प्रमाणे एकूण २० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुधीर तेलंग यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, सदर रक्कम तेलंग यांनी पंचासमक्ष स्विकारली असता, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.