पुणे: डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २) भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ५७३५ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि एकूण ५२८.८७ टन कचरा संकलित करण्यात आला.
पद्मश्री डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे पार पडले. पुणे शहरातील विविध ठिकाणी, तसेच जिल्ह्यात अनेक भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. कोथरूड, वारजे, बावधन, शिवणे, हडपसर, तळजाई पठार, विमानतळ रोड, आंबेगाव नऱ्हे आणि स्वारगेटसह अनेक परिसर स्वच्छ करण्यात आले.
यावेळी केळेवाडी येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन अभियानाची पाहणी केली. तसेच, आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे माळवाडी येथे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देत स्वच्छता कायम राखण्याचे निर्देश दिले. खासदार मेधा कुलकर्णी यांनीही सुतारदरा येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, दिपाली धुमाळ, सायली वांजळे, सामाजिक कार्यकर्ते भारत भूषण बराटे, सुनील बनकर, संजय हरपळे आणि विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संकलित कचरा महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर वाहून नेला. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.