पुणे : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात शहरात मोठमोठे देखावे साकारले जातात. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आता गणेशोत्सव काळात शहरासह जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीची सर्व दुकाने १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ नुसार किरकोळ मद्यविक्रीची सर्व सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune News) १९ आणि २८ सप्टेंबर असे दोन्ही दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तर २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.