भोरः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे असल्याचा संदेश देत रॅली काढून, नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच व्यावसायिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने येथे आठवडी बाजाराच्या निमित्ताने नवभारत साक्षरता अभियान रॅली आणि मतदान जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ. विकास खरात निवडणूक निर्णय अधिकारी भोर विधानसभा मतदार संघ भोर तथा उपविभागीय अधिकारी भोर, राजेंद्र नजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोर विधानसभा मतदार संघ भोर तथा तहसिलदार भोर, आदेश दूनखे निवडणूक नायब तहसीलदार, भोर, योगेश सरोदे महसूल सहाय्यक हे सर्व मान्यवर विशेष उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य यांच्यासमवेत राजगड ज्ञानपीठ संस्थेचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे फलक झळकावत आणि शासन आदेशानुसार नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत रॅली काढून मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले. राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष संग्राम थोपटे आणि मानद सचिवा स्वरूपा थोपटे यांनी सर्वांचे कौतुक केले व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.
देश हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा संविधानिक हक्क बजावला पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात सूचना फलक घेऊन “साक्षर व्हा !”आणि ‘मतदान करा’ अशा घोषणा दिल्या. बँड पथकाच्या आवाजाने व मतदान करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला गेला. या जनजागृतीच्या अभियानात शालेय तसेच कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनसोबत प्राचार्य रुबिना सय्यद, प्राचार्य स्वाती मोटकर आणि सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी स्काऊट व शालेय गणवेशात उपस्थित होते.
घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, आपण ते बजाविलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य रुबिना सय्यद