पिडीतांना लवकरात लवकर न्याय मिळावा, याकरिता प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे सरपंच परिषदेकडून तहसीलदारांना निवेदन
भोर –मसाजोग (तालुका -केज, जिल्हा -बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख व एकनाथ सूर्यवंशी यांची राजकीय वैमनस्यातुन निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ भोर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे यांनी हे निवेदन स्वीकारले.
देशमुख व सूर्यवंशी यांची झालेली हत्या यामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप झाला आहे त्यामुळे त्यांच्या हत्येला अजूनही न्याय मिळालेला नाही . त्यामुळे अशा कृत्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे .राज्यातील सर्व सरपंच पूर्णपणे असुरक्षित आहेत. देशमुख व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणे कामी प्रशासनाने सहकार्य करावे व लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मागणी या निवेदनात केली आहे असे न झाल्यास भोर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल व याकरता सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशी या निवेदनात सरपंच परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी भोर तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय गरुड ,कार्याध्यक्ष संतोष तुपे, दिपक भडाळे, बसरापुरचे माजी आदर्श सूर्यकांत बदक, शिंदचे गावचे सरपंच शंकर माने आदिंसह महिला सरपंच उपस्थित होते.