पुणेः कोथरुडमधील वाहतूकीच्या समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पाटील यानी कोथरुडमधील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल, असे निर्देश या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी दिले. या बैठकीमध्ये अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरून दिवसाला एक लाखांच्यावर वाहने फिरत असल्याचे सांगत वाहतूक नियमनासाठीच्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
या सादरीकरणामध्ये प्रामुख्याने पौड रस्ता आणि कर्वे रस्ता येथील अभिनव चौकच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद करणे, आनंदनगर मेट्रो स्टेशनजवळ पौड रोड रुंद करणे, कर्वे पुतळा पौड रस्त्याचे डावे वळण रुंद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कर्वेनगर ते वारजेपर्यंतचा रस्ता रुंद करणे किंवा या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, कमीन्स गेट समोरील डी. पी. रस्ता रुंद करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील रस्ता रुंद करणे, यांसह वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी कोथरुडमधील मिसिंग लिंक शोधून त्या पूर्ण करणे. रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जमीन हस्तांतरण आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पथ विभागाने समस्यांचे निराकरण करावे आदी उपाययोजना आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितल्या.
यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांच्या सह वाहतूक पोलीस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.
प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा संदीप खर्डेकर
तसेच वाहतूक शाखेला मनुष्यबळ कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवावी. त्याशिवाय वाहतूक नियमनासंदर्भात जनजागृतीसाठी एनएसएसची मदत घ्यावी अशा देखील सूचना पाटील यांनी केल्या. कोथरुडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिली.
कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर बनली असून, प्रशासनाने दोन पर्यायांवर काम करावे. त्यामध्ये दीर्घ कालीन उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यातील निष्कर्षांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन मार्ग काढू.
– मंत्री चंद्रकांत पाटील