जेजुरीः पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील काम गतीने सुरू आहे, मात्र काही ठिकाणचे काम पूर्ण अद्याप बाकी आहे. या महामार्गांवरील बहुतांश ठिकाणी रस्त्याची लेन एकसारखी नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळताना दिसत आहे. लवथळेश्वर भागातील हॅाटेल गोकुळच्या अगोदर रस्त्याची एकसारखी लेन करण्यात आलेली नाही. आज दुपारच्या सुमारास या ठिकाणी याचा अंदाज न आल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर मागे बसलेली महिला हवेत उडून जोरात रस्त्यावर आदळली. या अपघातामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. तत्काळ महिलेला जेजुरी आयसीयु येथे दाखल करण्यात आले. मात्र, महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने महिलेला पुढील उपचारासाठी पुणे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती येथील प्रत्यक्षदर्शीने दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून येथे सातत्याने अपघात घडत असून आतापर्यंत ५ जण अपघातामध्ये जखमी झाले असल्याची माहिती येथील व्यावसायिकाने दिली. या ठिकाणी पुण्याहून जेजुरी शहरात दाखल होत असताना उतार आहे. या ठिकाणी चारचाकी वाहनांचा वेग असतो. खरेतर कोणत्याही शहरात वाहने दाखल होत असताना वाहनांचा वेग कमी करून वाहने चालवायला हवीत. मात्र, या ठिकाणी अनेक वाहन चालक चारचाकी वाहने बेफाम पद्धतीने चालविताना दिसत आहेत. तसेच मालवाहतूक करणारे ट्रक यांचा देखील वेग अधिक असतो. यामुळे अशा प्रकारे एकसारखे ज्या ज्या ठिकाणी लेन नाहीत. तेथील लेन एकसारखे करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी देखील तत्काळ एकसारखा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी काळात अपघातांचे सत्र वाढतानाच दिसेल.
ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी मी इथेच होतो. अंगावर काटा आणणारा अपघात होता. इलेक्शनची वेळ आहे, नेत्यांनी गावोगावी दौरे करण्यापेक्षा लोक कल्याणासाठी केलेल्या विकास कामांची पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते. आतापर्यंत कुठल्या नेत्यांनी किंवा आमदारांनी या महामार्गाच्या कामाची पूर्ण पाहणी केली आहे का, हा माझा प्रश्न आहे…?
-साहिल मुंडे (प्रत्यक्षदर्शी)