फसवणूकीचा गुन्हा दाखल व तपास जलदगतीने सुरू
ठेवींचे पैसे परत मिळणार का ? ठेवीदारांची पोलीसांना आर्त हाक.
भोर तालुक्यातील रोहिडेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था घोटाळा व लोकांची केलेली फसवणूक प्रकरणी फरार असलेले संस्थेचे संचालक सागर आनंदा कोंढाळकर यास आर्थिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीणच्या पथकाने पुणे येथुन नुकतीच (दि.२६ डिसेंबर)अटक करण्यात आली असून व सदर घोटाळा व फसवणूकीचा तपास पोलिसांनी जलदगतीने सुरू केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रोहिडेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चिखलावडे पतसंस्थेचे संचालक सागर आनंदा कोंढाळकर (रा.चिखलावडे)व त्यांचे सहकारी यांनी सदर पतसंस्थेत तालुक्यातील गुंतवणूकदारांच्या रक्कमा ठेवीच्या स्वरूपात स्विकारून गुंतवणूकदारांचे पैसे न देता संस्थेच्या ठेवीदार गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करून अपहार केला आहे. सुमारे तीन कोटी साठ लाख रुपये रक्कमेचा यामध्ये समावेश आहे. याबाबत भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने सुरू आहे.
आरोपीची कसुन चौकशी सुरू असून आरोपीने गुंतवणूकदारांचे पैसे कुठल्या बॅंकेत , पतसंस्थेत , फायनान्समध्ये ठेवले आहेत की नाही याची खात्री केली जात आहे. तसेच तालुक्यात अथवा बाहेर इतरत्र कुठेही सदर आरोपीनामे जमीन, फ्लॅट अशी मिळकत व मोठी गुंतवणूक सापडल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे.तसेच या फसवणूकीत अजूनही काही संचालकाचा समावेश असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.सदर दोषींवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आमची आयुष्याची कष्टाची , मेहनतीची कमाई आम्ही पतसंस्थेत ठेवी म्हणून ठेवली होती परंतु मागील चार पाच वर्षापासून संस्था बंद असुन आरोपी फरार होता परंतु आता तो सापडला असून अटकेत आहे .आम्हाला आमचे गुंतवलेले पैसे लवकरात लवकर मिळावे अशी या संस्थेच्या ठेवीदारांनी , गुंतवणूकदारांनी पोलिसांना आर्त हाक दिली आहे.
” संस्थेच्या ठेवीदारांची संपूर्ण माहिती गोळा केली असून त्या ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.संस्थेच्या कर्जदारांवर कडक कारवाई होणार असून त्यांनी थकित कर्ज त्वरित भरावे. तालुक्यातील इतर संस्थानीही आपले कामकाज चोख बजावुन ठेवीदारांचे हित जपावे”
बाळासाहेब तावरे- सहाय्यक निबंधक भोर
” आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सदर पतसंस्था फसवणूक प्रकरणी आरोपीला सदर दोषाबाबत कठोर शिक्षा कारवाई करण्यात येईल.तसेच गुंतवणूकदारांचे, ठेवीदारांचे पैसे कसे परत मिळतील यादृष्टीने बारकाईने तपास जलदगतीने सुरू आहे ” .
सतीश होडगर -पोलीस निरीक्षक आ.गु.अ.वि.पुणे ग्रामीण