भोरः भोर विधानसभा निवडणुकीत तिन्ही तालुक्यापैकी मुळशी तालुका हा गेम चेंंजर ठरला आणि शंकर मांडेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भोर विधानसभेवर १५ वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या संग्राम थोपटे यांना धोबीपछाड देत या मतदार संघात मांडेकर यांनी विजयाची पताका रोवली. कुलदीप कोंडे आणि किरण दगडे यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढल्याने येथे चौरंगी लढत झाली. यामुळे या निवडणुकीत कोंडे आणि दगडे हे दोन फॅक्टर महत्वाचे मानले जातात. आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. यामुळे आघाडीला धोक्याची घंटा असल्याचे आकडेवारी सांगते. विधानसभा निवडणुकीत भोर व वेल्हा राजगड तालुक्यातील पाचही जिल्हा परिषदेत गटात महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीसाठी जमेची बाजू कोंडे आणि दगडे हे ठरलेले आहेत. या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या पाहता त्यांना मानणार वर्ग या भागात आहे. याचा फायदा महायुतीला आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आकडेवारीवर नजर
भोर विधानसभा निवडणुकीत वर म्हटल्याप्रमाणे कोंडे आणि दगडे हे दोन फॅक्टर महत्वाचे आहेत. भोर, राजगड या तालुक्यात संग्राम थोपटे यांनी आघाडी मिळाली असली तरी येथे कुलदीप कोंडे यांना मिळालेली मते महत्वाची मानली जातात. हीच परिस्थिती राजगड तालुक्यात देखील आहे. आता मुळशीत थोपटे यांना फार कमी मते मिळाली. तर या मतदार संघात किरण दगडे यांना मिळालेली मते महत्वाची मानली जातात. कुलदीप कोंडे यांना भोर (२४२३६ मते), वेल्हे (३६६८ मते मुळशी (१०४४ )एकूण (२९०६५ मते), किरण दगडे यांना भोर (११२०२ मते), वेल्हे (१२२५ मते), मुळशी (१३१३२ मते) एकूण (२५६०१ मते) मिळाली. कोंडे व दगडे यांनी एकूण मिळून ५४६६६ सर्वाधिक मते घेतली. याचा मोठ्या प्रमाणार फटका महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांना बसला. मुळातच कोंडे हे शिवसेनेच्या आणि दगडे भाजपच्या पक्षातून उगम झालेले पदाधिकारी आहेत. यामुळे याचा फायदा महायुतीला होणार असे दिसते.
….म्हणून आघाडीला फटका आणि महायुतीला फायदा
महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांचा १९६२५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. माञ मुळशी तालुक्यात मिळालेल्या ५३३७४ मतांच्या आघाडी थोपटे भोर, वेल्हे तालुक्यात तोडू शकले नाहीत. भोर, वेल्हे तालुक्यात थोपटे यांना ७९७९२ तर मांडेकर यांना ४५५०३ मते मिळाली. थोपटे यांनी ३४२०० ची आघाडी घेतली. मात्र, मुळशी तालुक्यात थोपटेंना झालेले कमी मतदान आणी मांडेकर यांनी मुळशीत घेतलेली आघाडी तसेच भोर, वेल्हेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने केलेले एकसंघ काम यामुळे आघाडीला फटका आणि महायुतीला फायदा मिळाला.