सासवडः पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत तीन उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रचाराला वेग प्राप्त झाला असून, जाहीर सभा, कोपरा सभा, घोंगडी बैठक, प्रचार रॅली आदी गोष्टींवर भर देण्यात येत आहे. असे सगळे होत असताना दुसऱ्या बाजूला पैशांची खैरात केली जात आहे. धनाचा वापर करून प्रचारासाठी माणसे गोळा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पक्षाच्या उमेदवाराकडून रोजाने प्रचारासाठी माणसे बोलवली जात असून, त्यांना रोजाने पैसे दिले जात आहे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
धनाच्या जोरावर तरुणांचा राजकीय वापर
मुळात सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचा माहोल आहे, तालुक्यात युवा वर्गाची लक्षणीय संख्या आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. अशा युवक वर्गाला टार्गेट करून त्यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यांना धनाचे लालच धाकवून निवडणुकीपुरता त्यांचा राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला जात आहे. ही मूळातच मोठी गंभीर बाब आहे, युवावर्गाची दिशाभूल करण्यात येत आहे. तरूणांचा देखील नाईइलाज असून, पैसे मिळतात ना मग बस असे म्हणत ते हे सगळं करत आहेत. यामध्ये तरुणांपासून अनेक वयोगटातील माणसांचा समावेश आहे.
ही सर्व माणसे पुरंदर विधानसभेला लागून असलेल्या इतर तालुक्यातून भाड्याने आणली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असून, राज्यातील हाय व्होल्टेज लढतीपैकी पुरंदर विधानसभेची लढत मानली जात आहे. प्रचारासाठी अवघा आठवडा बाकी राहिलेला आहे. अशातच भाड्याने माणसांची प्रचारासाठी जमवाजमव केल्याने याची मोठी चर्चा तालुक्यातील अनेक भागात होताना दिसत आहे.