भोर (जि. पुणे) : शहरातील श्रीपतीनगर येथे रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या चार घरांमध्ये घरफोडी करून तब्बल २६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पोलिस ठाण्याच्या १००-२०० मीटर अंतरावरील श्रीपतीनगर परिसरात चार बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. यात सोने, चांदी, रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सोमवारी सकाळी संबंधित कुटुंबांनी घरी परतल्यावर या चोरीच्या घटना उघडकीस आल्या.प्रथम भारती मोरे यांच्या घरात चोरी झाली. त्या रविवारी कुटुंबासह लग्नसमारंभासाठी बाहेर गेल्या होत्या. सोमवारी दुपारी घरी आल्यावर दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ६ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघड झाले. या रकमेतून परदेशात शिक्षण घेत असलेल्या मुलासाठी पैसे पाठवण्याचे नियोजन होते.दुसरी घटना सविता जेधे यांच्या घरी घडली. त्या धार्मिक कार्यक्रमासाठी मूळगावी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी घरी आल्यावर घरातील ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांनी पाहिले.तिसऱ्या घटनेत माधव पुरोहित यांच्या घरातून १४ तोळे सोने, अडीच किलो चांदी, आणि २ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. लग्न समारंभासाठी हे दागिने आणि रोकड घरात ठेवली होती.चौथ्या घरफोडीत भानुदास वंजारी यांच्या घरातून ५० हजारांची रोकड आणि ४ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले.
माधव पुरोहित यांच्या फिर्यादीवरून भोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकाने पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक मोहिते आणि अमोल शेडगे यांनी तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक करपे पुढील तपास करत आहेत.
पोलिस ठाण्याच्या जवळच अशा प्रकारच्या घरफोड्या झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्याची आणि रात्री गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.या घटनांमुळे श्रीपतीनगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.