राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात केले. तसेच नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असल्याची खंत देखील थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजगड तालुक्यातील महाविकास आघाडातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मनापासून काम केल्याबद्दल थोपटे यांनी सर्वांचे आभार यावेळी मानले. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमुठ कायम ठेवून कामाला लागण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुकाअध्यक्ष नाना राऊत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाअध्यक्ष संतोष रेणुसे, शिवसेना उबाठा गटाचे शैलेंद्र वाडगुडे, मा. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, राजगड संचालिका शोभा जाधव, वांगणीचे सरपंच शिवाजी चौरगे, आकाश वाडघरे, प्रकाश रेणुसे, अमोल पडवळ, दत्ता गायकवाड आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वज्रमुठ कायम ठेवावीः थोपटे
राजगड तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने विधानसभा निवडणुकीत काम केले. तयारी केलेली वज्रमुठ कायम ठेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी मा. आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










