भोरः राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी निकालाचा दिवस आहे. या दिवशी भोरचा आमदार कोण याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी पुणे-सातारा महामार्गालगत या मतदार संघात निवडणुकीला उभ्या असणाऱ्या एका उमेदवाराचे निकालाआधीच आमदार झाल्याबद्दल शुभेच्छांचा बॅनर झळकविण्यात आला आहे. हा बॅनर या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, या ठिकाणी या बॅनरचीच चर्चा होताना दिसत आहे. हा बॅनर आहे, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचा या बॅनेरवर शंकरभाऊ मांडेकर यांची भोर-राजगड-मुळशी आमदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हा बॅनर शिंदेवाडी पुणे सातारा महामार्ग भोर या ठिकाणी लावण्यात आला आहे. सदर बॅनरवर शुभेच्छुक म्हणून सचिन पांडुरंग हांडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असे लिहिण्यात आले आहे. यामुळे निकालाआधीच मांडेकर समर्थकांनी शंकर मांडेकर यांना बॅनरच्या माध्यमातून विजयी घोषित केले आहे. सध्या सोशल मीडिया व आदी ठिकाणी संबंधित उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची बॅनरबाजी करण्यात येत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे.