सारोळा : सोमवार ( दि. ५ ) ऑगस्ट रोजी न्हावी ( ता. भोर ) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे शिवसेनेच्या मा. जिल्हा परिषदेच्या सदस्या शलाका कोंडे यांना समताच त्यांनी लागलीच या शाळेला भेट दिली. यावेळी शाळेचे उपशिक्षक अनिल चाचर, रुपाली पिसाळ (चाचर), सोनाली बोन्द्रे यांनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील विविध उपक्रम आणि वाढलेला पटसंख्या याबाबत कोंडे यांनी माहिती घेत शाळेसाठी लागणाऱ्या विविध गोष्टींसाठी आपण सढळ हाताने मदत करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच शाळेने राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येथील प्राथमिक शिक्षकांनी प्रामाणिकपणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने शाळेतील भौतिक सुविधा आणि अल्पावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाल्याची दिसून येत आहे. न्हावी येथील शिक्षकांनी राबवलेले उपक्रम प्रेरणादायी असून, तालुक्यात अशा पद्धतीने इतर शिक्षकांनी देखील या उपक्रमांचाअवलंब करावा, असे आवाहन शलाका कोंडे यांनी यावेळी बोलताना केले. शिक्षकांच्या विनंतीनुसार शलाका कोंडे यांना यावेळी पहिलीच्या मुलांचे अध्ययन व अभ्यास कशाप्रकारे आहे, याबाबत मुलांची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांनी न अडखळता इंग्लिश व मराठीचे वाचन आत्मविश्वासाने करून दाखवले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शलाका कोंडे यांना त्यांचे नाव विचारले असता सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचे आई-वडील आणि आडनाव असे एकत्रित नाव सांगितले. मुलांची प्रगती पाहून कोंडे यांनी इंग्रजी अध्ययन समृद्धीसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शुभेच्छा देत शिक्षकांचे अभिनंदन केले