भोर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता केवळ राजकीय नाराजीपुरती मर्यादित न राहता थेट “स्वाभिमानाची लढाई” बनत चालली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षातील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला असून भोंगवली–कामथडी गणात बंडखोरी अटळ असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कामथडी–भोंगवली जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम खुटवड यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या निर्णयामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या, गावागावांत मजबूत जनसंपर्क असलेल्या बाठे यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. “ही लढाई आता पदासाठी नसून स्वाभिमानासाठी आहे,” अशी भावना उघडपणे बोलून दाखवली जात आहे.
पंचायत समितीच्या कामथडी गणासाठी गणेश निगडे यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी विश्वजीत जगताप, उदय शिंदे आणि अक्षय सोनवणे यांसारख्या इच्छुकांना संधी नाकारण्यात आल्याने असंतोष उफाळून आला आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज इच्छुकांना पर्याय उरला नाही. परिणामी काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत थेट निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडामोडींमुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षांतर्गत बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता असून याचा थेट फायदा विरोधकांना होऊ शकतो. “आमच्या मेहनतीला न्याय मिळाला नाही,” ही भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असल्याने निवडणूक अधिक भावनिक आणि प्रतिष्ठेची ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भोंगवली–कामथडी गटातील ही लढाई आता स्पष्टपणे स्वाभिमानाची बनली असून तिचा परिणाम संपूर्ण भोर तालुक्याच्या राजकारणावर उमटणार, हे निश्चित मानले जात आहे.















