नसरापूर (प्रतिनिधी) — नसरापूर परिसरात गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिप्नॉटिझम करून एका ६५ वर्षीय महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीने मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण व हातातील अंगठी असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लुटलेली महिला कमल शिवाजी रेणुसे (वय ६५, रा. नसरापूर, ता. भोर) असून त्या रोजच्या प्रमाणे त्यांच्या हरदेव हॉटेल व्यवसायाकडे जात असताना प्रथम श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर पडताच मास्क घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबवले. स्वतःला जैन समाजाचा असल्याने मंदिरात जात नसल्याचे सांगत त्याने महिलेला ९०० रुपये मंदिरात दान करण्याची विनंती केली.
महिलेने त्याच्यासोबत दान करण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर आरोपीने त्यांना दुचाकीवर बसवून बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराजवळ नेले. तेथे हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली त्यांच्याकडील सोन्याचे गंठण व अंगठी लंपास केली. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित माने यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल करून तपासाचा वेग वाढवण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.