मुळशीः उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी संग्राम थोपटे यांना मोठ्या मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहन उबाठा गटाचे संजय राऊत यांनी येथे आयोजित केलेल्या सभेच्या माध्यमातून येथील नागरिकांना केले. आमच्याकडे गद्दारी करून गद्दारांच्या गटात हे महाशय गेले म्हणजे फार मोठा तीर मारला असे नाही, असे टोला त्यांनी शंकर मांडेकर यांचे नाव न घेता त्यांना लगाविला. गद्दार जरी गेला असला तरी सगळी शिवसेना तिथेच आहे आणि ती संग्राम थोपटे यांच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. थोपटे आणि पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. यामुळे संग्राम थोपटे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ही निवडणूक केवळ संग्राम थोपटे यांना आमदार वा मंत्री करण्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्याची आणि अस्मितेची लढाई असल्याची स्पष्टोक्ती राऊत यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याचे ते म्हणाले. सत्तेत सामिल झालेल्यांना ५० कोटी रुपये देऊन विकत घेतले. तसेच अजित पवार यांच्यासारखे लोकं ईडी आणि सीबीआयच्या भीतीने खाबरून पळून गेले. पण मी खाबरलो नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला फोडण्याचे काम झाले. मात्र, या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. या सभेला मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.