राजगडः भोर विधानसभेत विविध ठिकाणी उमेदवारांसाठी सभा पार पडल्या. यामध्ये अजित पवार, शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सभा झाल्या. मुळशी तालुक्यात संजय राऊत यांची सभा कशी काय झाली, असा सवाल अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी राऊत यांना केला. तुम्ही काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घ्यायला निघाला ही आमची शोकांतिका असल्याचे कोंडे म्हणाले. तसेच निवडणुकीत काय होईल हे माहित नाही, पण सगळ्यांची पळवली हे मात्र नक्की, अशी मिश्किल टिप्पणी कोंडे यांनी यावेळी केली. विकास केला तो तुमच्या बगलबच्छांना खायला पुरत नाही. तुमच्या बोर्ड पाट्या मोठ्या रक्कमेच्या लागलेल्या असतात. मात्र, प्रत्यक्षात कोणतच काम झालेले नसते. यात तुम्ही राजकारण करताय असा खोचक सवाल कोंडेंनी केला. ते राजगड तालुक्यात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला या सभेला उपस्थित होत्या.
जनतेसाठी निवडणूक लढतोय. या काळात पैशांचे आमिष दाखविण्यात आले. त्याला बळी पडलो नाही. इथल्या जनतेसाठी निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. काही लोकं म्हणतात की, यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. तुम्ही किती विकास केला हे इथल्या जनतेला माहिती आहे, असा सवाल कोंडे यांनी केला. या सभेच्या माध्यमातून कुलदीप कोंडे यांनी विद्यमान आमदारांवर टीकेची तोफ डागली. १५ वर्षांपासून अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक अजून झालेली नाही. भाटघर धरणग्रस्तांचे प्रश्न, निरा देवधर, गुंजवणी आदी प्रश्न आहेत तसेच आहेत. त्याचप्रमाणे इथल्या गड किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे होते ते झालेले नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित करून कोंडे यांनी थोपटे यांचा समाचार घेतला.
पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांना रोजगारः कोंडे
राजगड तालुक्यात महादेव कोळी, आदिवासी समाज आणि धनगर समाज मोठ्या प्रमावर आहे. त्यांना त्यांच्या हक्काची घर नाहीत. पिवळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी मोठा आटापिटा त्यांना करावा लागतो. ज्या ठिकाणी या समाजातील लोकवस्ती आहे, तिथे जायला रस्ता नाही. शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून हा समाज आजही वंचित राहिलेला आहे. उपसा सिंचन योजना, शिवगंगा खोरे योजना आदी योजना पूर्ण कराव्या लागतील, नाहीत बारामती तालुक्याला एक थेंबही पाणी जाणार नाही,असे कोंडे यावेळी म्हणाले. वेल्हे तालुक्याला पर्यटन भाग म्हणून घोषित करायला भाग पाडणार असल्याचे कोंडे यावेळी म्हणाले. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन कोंडे यांनी यावेळी दिले. बारामतीच्या दुधात जितकी ताकद नाही, तितकी ताकद आमच्या पाण्यात असल्याचा निशाणा कोंडे यांनी लगाविला.